जिथे अधर्म तिथे धर्म राहू शकत नाही – उद्धव प्रभूजी शास्त्री




 

सोमेश्वर मंदिर येथील संगीतमय भागवत कथेला तिसऱ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड
जिथे अधर्म असतो त्या ठिकाणी धर्म राहू शकत नाही. ज्या ठिकाणी जुगार, नशापान, वेश्यागमन, मांसाहार त्या ठिकाणी सुख शांती राहू शकत नाही. त्यामुळे या चार गोष्टी पासून दूर राहा आणि सुखी आयुष्य जगा. असा मौलिक सल्ला वृंदावन येथील उद्धव प्रभुजी भक्तीशास्त्री यांनी तमाम भक्तांना दिला.
बीड येथील बार्शी रोडवर बिंदुसरा नदीच्या तीरावर असलेल्या जाज्वल्य सोमेश्वर मंदिरात संगीतमय भागवत कथेचे तिसरे पुष्प वृंदावन येथील उद्धव प्रभुजी भक्ती शास्त्री यांनी शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 दरम्यान गुंफले. या भागवत कथेचे आयोजन सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे यांनी केले आहे. यावेळी भाविक भक्ताने मोठ्या भक्तीने संगीतमय भागवत कथेचा लाभ घेतला. आपल्या प्रवचनात पुढे बोलताना उद्धव प्रभुजी म्हणाले,भगवंताचे नाव घेतल्याने तुमच्या आयुष्याचे कल्याणच होणार आहे. धार्मिक कार्यात बाधा आणणारा कलियुग 5 हजार वर्षांपूर्वी आला आहे. कलियुग म्हणजे काय काळ आहे. तो कोणीही थांबू शकत नाही. पांडू महाराजांचे वंशज परीक्षित महाराजांना जेव्हा कलियुग शरण गेला त्यावेळी आश्रयदाते असलेल्या परीक्षित महाराजांनी त्याला चार ठिकाणी जागा दिली. त्यामध्ये जुगार अडड्याची जागा, नशापान करणारी जागा, वेश्यागमन आणि मांसाहार करणारी जागा या चारही जागेवर कलयुग आपला वास करत आहे. तेव्हा अशा जागेपासून चार हात लांब राहिलात तर तुम्ही सुखी आयुष्य जगू शकाल. मात्र दुर्दैवाने आज या चारही ठिकाणी मनुष्य आपले वास्तव्य करत आहे. त्यामुळे त्याच्या जीवनातला आनंद संपुष्टात येऊन तो कायम विचारात, संकटात, चिंतनात अडकत चाललेला आहे. दुर्दैवाने आज महिला देखील नशापाणी करण्यामध्ये कमी राहिलेल्या नाहीत. मिश्रि, तंबाखू, बिडी सिगारेट एवढेच नव्हे तर दारू सुद्धा पिवून रस्त्यावर नको ते चाळे करताना त्या दिसत आहेत. ही परिस्थिती सामाजिक आणि कौटुंबिक कलह निर्माण करणारी आहे. याला वेळीच आवर घालणं गरजेचे आहे. पाच हजार वर्षांपूर्वी जेव्हा कलियुग या चार जागा शोधत होता तेव्हा त्याला एकाही ठिकाणी जागा सापडली नाही. मात्र अवघ्या पाच हजार वर्षात आज या चारही जागेमध्ये कलयुगाचा वास जागोजाग दिसून येतो. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कायम हरीचा जप करा भगवंताचे नामस्मरण करा आणि भागवताचे आचरण करा. संपूर्ण आयुष्याचे सार भागवतात असल्याने भागवताला महापुराण म्हटले आहे असे महत्वपूर्ण विचार आपल्या अमृततुल्य विचार वाणीतून उद्धव प्रभुजी भक्त शास्त्री वृंदावन महाराज यांनी व्यक्त केले. संगीतमय भागवत कथेच्या तिसरे पुष्प ऐकण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आरतीने तिसऱ्या पर्वाला पूर्णविराम देण्यात आला.

कोणतीही नशा जीवघेणीच…
नशा कोणतीही असो ती तुमचे आयुष्य उध्वस्त करते. त्यामुळे कोणत्याही नशेच्या आहारी जाऊ नका. तुम्हाला चहा कॉफीची लागलेली सवय देखील एक नशाच आहे. यामुळे तुमची भूक मरते आणि तुमचे आयुष्य हळूहळू कमी होते. तुम्हाला अनेक व्याधी जडल्या जातात आणि त्यात तुमचा मृत्यू दुर्दैवीरित्या होतो. ब्रिटिशांनी भारतीयांसाठी चहा आणि कॉफी एक स्लो पॉयझन म्हणून जाताना दिलेले आहे हे आता तरी ओळखा.

पूर्वीचे रतन मामा झाले राम कृष्ण हरिदास…
बीड येथे जेव्हा वृंदावन मंदिर उभारणीचे काम सुरू झाले त्यावेळी या मंदिर परिसरामध्ये दारूच्या आहारी गेलेले रतन मामा मंदिरात येत असत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते कायम दारूच्या नशेत असायचे. रस्त्यात नालीत कुठेही पडलेले असायचे. ते हळूहळू भगवंताच्या चरणी लीन झाले. दारूची नशा सोडून त्यांनी भक्तीची नशा स्वीकारली. त्यामुळे ते रतन मामाचे रामकृष्ण हरिदास झाले. बीडच्या या भक्ताला मी विदेशात असलो तरी सुद्धा विसरत नाही.असे एक भक्त सुद्धा बीडकरांनी आदर्शवत दिलेले आहेत.त्यामुळे तुम्ही देखील रामकृष्ण हरिदास होऊ शकतात. त्यासाठी आपल्या मनाची तयारी आणि भगवंताचे स्मरण गरजेचे आहे.

सांज समयी नको ते उद्योग करू नका…
सांज समय हा भगवंताच्या चरणी लीन होणारा अमूल्य वेळ आहे. सूर्य उगवताना आणि मावळतानाचा क्षण हा अमृततुल्य क्षण आहे. या वेळेमध्ये नको ते उद्योग कधीही करू नका. या वेळेत जर कामलीला केली तर राक्षसी वृतीची पैदास होते.त्यामुळे या पवित्र वेळी फक्त भगवंतांचे स्मरण करा असा मौलिक सल्ला दिला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा