अजित पवार ED च्या भीतीमुळे BJP सोबत गेले: शरद पवार यांचा खुलासा; म्हणाले- चिंता नको, चिन्ह गेले तरी लोक बदलणार नाहीत!




उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे सहकारी आमदार ED च्या भीतीमुळे भाजपसोबत गेल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण चिता करण्याची गरज नाही. चिन्ह केवळ आधार असते. चिन्ह गेले तरी लोक बदलत नाहीत हा माझा अनुभव आहे, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकारिणीची गुरुवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी पक्षांतर्गत स्थिती तथा महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकला. विशेषतः पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले तरी काळजी करण्याची काहीच गरज नसल्याचा विश्वास आपल्या सहकारी नेत्यांना व कार्यकर्त्यांना दिला.

अजित पवार व त्यांचे समर्थक ईडीच्या कारवाईमुळे भाजपसोबत गेलेत. त्यांनी माझी भेट घेऊन सत्तेत सहभागी होण्याची विनंती केली. आमच्याविरोधात ईडीची कारवाई सुरू आहे. त्यातून काहीतरी मार्ग काढा. तुम्ही आला नाहीत, तर ईडी येईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पण आता पक्ष सोडून गेलेल्या लोकांच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही, असे शरद पवार म्हणाले.

काळजी करण्याचे कारण नाही

यावेळी त्यांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले तरी काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही स्पष्ट केले. काही लोकांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह बदलण्याचे कारस्थान रचले आहे. पण घाबरण्याचे काहीच कारण नाही. निर्णय काहीही आला तरी लोक हुशार आहेत. त्यांना बटण कोणते दाबायचे हे चांगले माहिती आहे, असे शरद पवार म्हणाले.

यासंबंधी पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कधी व केव्हा निवडणूक चिन्ह बदलत गेले याचा अनुभवही सांगितला. मी पहिली निवडणूक लढलो. त्यावेळी मला बैलजोडी चिन्ह मिळाले. त्यावर लढून मी जिंकलो. त्यानंतर 3 वर्षांनी संघर्ष झाला. काँग्रेसची ‘काँग्रेस आय’ व ‘काँग्रेस ओ’ या 2 गटांत विभागणी झाली. निवडणूक आयोगाने आम्हाला चरखा चिन्ह दिले. तेव्हाही मी जिंकलो.

चिन्ह बदलले तरी लोक बदलत नाहीत

त्यानंतर आणीबाणी आली. इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण होते. त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा चिन्ह बदलले. नवे चिन्ह गाय – वासराचे मिळाले. त्यानंतर पाचवे चिन्ह घड्याळ मिळाले. आता पुन्हा चिन्ह बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण चिंता करण्याची गरज नाही. निवडणूक चिन्ह केवळ आधार आहे. चिन्ह बदलले तरी लोक बदलत नाहीत असा माझा अनुभव आहे, असे शरद पवार म्हणाले.

70 जणांनी माझी अध्यक्षपदी निवड केली

शरद पवारांनी यावेळी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 70 जणांनी माझ्या नावाचा प्रस्ताव देत त्यावर स्वाक्षऱ्या केल्याची बाबही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिली. ते म्हणाले की, आमच्या जुन्या सहकाऱ्यांनी आपल्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांच्या मते ते राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. तालकटोरा स्टेडिअममध्ये झालेल्या बैठकीत झालेली अध्यक्षांची निवड चुकीची आहे. त्यांच्या मते पक्षाचे नाव व पक्षचिन्हाचा वापर करण्याचा अधिकार केवळ त्यांनाच आहे, आपल्याला नाही.

गंमतीची गोष्ट म्हणजे तालकटोराच्या बठकीत हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तिथे निवडणूक घेण्याची जबाबदारी रिटर्निंग अधिकाऱ्याकडे होती. त्यांनी 2 दिवसांचा वेळ दिला. त्यानंतर 70 जणांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यात केवळ माझे एकट्याचेच नाव होते, असे शरद पवार म्हणाले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा