पेपरफुटीला लगाम:जिल्हा परिषद गट ‘क’ संवर्गातील सरळ सेवा भरतीच्या परीक्षेत 5-जी जॅमर; गडचिरोली, वर्ध्याचे सेंटर बदलणार




मागील काही स्पर्धा परीक्षा, पोलिस भरती परीक्षांमध्ये मोबाइलवरून कॉपी व पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. याला पायबंद घालण्यासाठी राज्यातील ग्रामविकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील सरळ सेवा भरती परीक्षांदरम्यान परीक्षा केंद्रांवर जॅमर बसवण्यात येणार आहे. हे जॅमर ५ जी फ्रिक्वेन्सी नियंत्रित करणारे असेल. तशा सूचना ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासंदर्भात २९ सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक महत्त्वाची बैठक झाली.

सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील परीक्षार्थींना इतर जिल्ह्यातील परीक्षा केंद्र

  1. गडचिरोली जिल्ह्यासाठी गट क संवर्गातील भरतीसाठी दिलेले गॅलक्सी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी सेंटर ७ व ८ तारखेच्या परीक्षेसाठी तेच असेल तर १० व ११ तारखेच्या परीक्षेसाठी मात्र हे सेंटर बदलले जाईल.
  2. वर्धा जिल्ह्यासाठीही ७ तारखेला तानिया कॉम्प्युटर हे सेंटर असेल. नंतर ते बदलले जाईल. हे सेंटर योग्य नसल्याने ते बदलण्याची मागणी वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली होती.
  3. बुलडाणा येथील परीक्षार्थींना जळगाव हे सेंटर देण्यात आले होते. ते ७ व ८ तारखेच्या परीक्षेसाठी कायम असेल. मात्र हे केंद्र बदलण्याबाबत बुलडाणा जिल्हा परिषदेने विचार करावा असे प्रधान सचिवांनी बैठकीत सुचवले.
  4. जळगाव जिल्ह्यात परीक्षा देणाऱ्या बुलडाण्याच्या अपंग परीक्षार्थींंना लेखनिक देण्याची जबाबदारी जळगाव जिल्हा परिषदेची असणार आहे.
  5. सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील परीक्षार्थींना इतर जिल्ह्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. १० व ११ तारखेला होणाऱ्या परीक्षेसाठी शक्यतो जिल्ह्यातील परीक्षा केंद्रच देण्यात यावे, अशी सूचना प्रधान सचिवांनी परीक्षा घेणाऱ्या आयबीपीएस कंपनीला दिली.

दोन दिवस आधीच तंत्रज्ञांची असेल उपस्थिती

यापूर्वी झालेल्या तलाठी भरतीसह इतर परीक्षांमध्ये शासनाला मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या परीक्षांच्या दोन दिवस आधीच संबंधित कंपनीच्या तंत्रज्ञांनी परीक्षा केंद्रांवर उपस्थिती लावत यंत्रणांची चाचपणी करावी, अशी मागणी हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केली. त्यानंतर प्रधान सचिवांंनी संबंधित कंपनीला या सूचनेचे पालन करण्याचे आदेश दिले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा