पुण्यात 13 वर्षांच्या मुलाने कांदा चिरताना वडिलांना भोसकले




पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात हत्येची आणखी एक घटना समोर आली आहे. बहिणीसोबत झालेल्या भांडणानंतर वडील ओरडल्याचा राग 13 वर्षांच्या मुलाच्या मनात घोळत होता. याच रागातून मुलाने वडिलांची सुरीने भोसकून हत्या केली.

मयत 40 वर्षीय इसम पुण्यातील कात्रज-देहू रोड बायपसजवळ एका रहिवासी इमारतीत वॉचमन म्हणून काम करत होता. दोन मुलगे, दोन मुली आणि पत्नीसह इमारतीच्या पार्किंग लॉटमध्येच तो राहत होता. गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजता तो घरात कांदा चिरत होता. त्यावेळी त्याचा 13 वर्षांचा मुलगा आणि एक मुलगी भांडत असल्याचे त्याला दिसले. त्याने दोघांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली.

वडील ओरडल्याचा राग मुलाला आला. त्याने वडिलांनी कांदा चिरण्यासाठी घेतलेली सुरी उचलली आणि त्यांच्याच पोटात खुपसली. एकच घाव वर्मी बसला आणि वॉचमन जागीच कोसळला, अशी माहिती पोलिसांनी दिल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडिया  वृत्तपत्राने दिले आहे. स्थानिकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर 13 वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा