सुनेने मुलासमोरच ब्लाऊजने आवळला सासूचा गळा




पुणे : जिल्ह्यातील तळेगावा किरकोळ कारणावरून सुनेने सासूचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस चौकशीदरम्यान खुनाचे मूळ कारण पुढे आलेय. अडीच वर्षीय नातवाने आजीचा मोबाईल खेळण्यासाठी घेतला होता. तो खेळत असताना फुटला यावरून आजीने नातवाला सुनावले तसेच मोबाईल कोण भरून देणार यावरून सुनेचे आणि सासूचे वाद पेटले. यातून घरातील ब्लाऊज घेऊन अडीच वर्षीय मुलासमोरच सुनेने सासूचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीये.

पूजा शिंदे आणि तिचा पती म्हणजेच मृत महिलेचा मुलगा मिलिंद शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना ५० वर्षीय बेबी शिंदे यांची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पूजा आणि मिलिंद या दोघांचे २०१७ साली लग्न झाले. शिंदे कुटुंबात सासू बेबी शिंदे, दिर असा चार जणांचे एकत्रित कुटुंब होते. दरम्यान, काही महिन्यात सून पूजा आणि सासू बेबी यांच्यात खटके उडायला लागले. अनेकदा किरकोळ करणावरुन या दोघींमध्ये टोकाचे वाद व्हायचे. नातू झाल्यानंतर तरी सासू सुनांचा वाद मिटेल असे घरातील व्यक्तींना वाटत होते. मात्र, तसे काहीच झाले नाही.

२१ मे रोजी नातवाने आजीचा मोबाईल खेळण्यासाठी घेतला होता. तो त्याच्याकडून फुटला यावरून पूजा आणि तिच्या सासूमध्ये मोठा वाद झाला. याच वादातून पूजाने अडीच वर्षीय मुलासमोरच ब्लाऊजने सासूचा गळा आवळून खून केला. ही घटना घडली तेव्हा घरात अडीच वर्षांच्या मुलाशिवाय कोणीही नव्हते. मृतदेह राहत्या घराच्या छतावर पोत्यात घालून लपवून ठेवला. मात्र, काही तासांनी छतावर दुर्गंधी येत असल्याने इतरांना संशय आला हेच पाहून पूजाने पोत्यात टाकलेला मृतदेह ओढत शेजारील झाडीत लपवला. मात्र, सर्व बिंग फुटले आणि घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्याचा छडा लावला. यात गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी पती मिलिंदला ही अटक केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा