आगामी निवडणुका शिवसेनाच जिंकणार ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे




लातूर : राजकारणासह समाजकारण करत असल्यामुळे शिवसेना जनतेला हवीहवीशी वाटते. कोरोनासारख्या संकटातही शिवसेना जनतेसोबत उभी राहिली. ही मदत जनता विसरणार नाही. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका शिवसेना जिंकणार असल्याचा विश्वास ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी लातूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीनही पक्ष या निवडणुका एकत्रितच लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगरपंचायत निवडणूक पूर्वतयारीच्या अनुषंगाने दौर्‍यावर आलेल्या खैरे यांनी लातूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुका जिंकण्याची तयारी पक्षाने केली आहे. त्यापुढील टप्प्यात जि.प. व पंचायत समित्यांच्या तसेच नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी लातूर महानगरपालिकेची निवडणूक होईल. त्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. प्रत्येक ठिकाणी शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीने एकत्रितपणे या निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. काँग्रेस स्वबळाची भाषा करत असली तरी नेत्यांची वक्तव्य कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आहेत. मुख्यमंत्र्यांनी एकत्रित लढणार असल्याचे सांगितले असून आम्ही त्यांचा आदेश पाळणार असल्याचे खैरे म्हणाले. नोव्हेंबर महिन्यापर्यंत निवडणूका जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळात शिवसैनिक जनतेमध्ये काम करत होते. गरजवंतांना अन्नधान्य तसेच किट वाटप, औषधी, इंजेक्शन मिळवून देण्यासारखी कामे शिवसैनिकांनी केली. कोरोना जनजागृती अभियान आणि लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून जनतेमध्ये पोहोचून संकटकाळात नागरिकांना आधार देण्याचे काम केले. वैद्यकीय मदत कक्षांची स्थापना केली. मुख्यमंत्री स्वतः सक्रिय होते. त्यामुळेच कोरोनावर मात करणे शक्य झाले. आता देखील तिसर्‍या लाटेची तयारी पूर्ण झाली असल्याचे खैरे म्हणाले. शिवसैनिक कामात असताना विरोधी पक्ष मात्र आंदोलन करत होते. त्यांना जनतेशी देणेघेणे नव्हते असा टोलाही खैरे यांनी लगावला. जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्रितच आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे आपल्याला भेटून गेले आहेत. पालकमंत्री अमित देशमुख यांच्याशीही भेट होणार आहे. आम्ही सोबतच आहोत. राज्यात सरकार व्यवस्थित काम करत आहे. महाविकास आघाडीमुळे काँग्रेसची ताकद वाढली आहे. केंद्रातील सरकारची गाईडलाईन चुकलेली आहे. इंधन दरवाढीत चालबाजी केली जात असल्याचेही खैरे म्हणाले. या पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, शहर जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, महिला आघाडीच्या अध्यक्षा. सुनिता चाळक, डॉ. शोभा बेंजरगे, उपजिल्हाप्रमुख सचिन दाने, बालाजी रेड्डी, लिंबन महाराज रेशमे, लातूर ग्रामीण तालुका प्रमुख ऍड. प्रवीण मगर, लातूर शहर तालुकाप्रमुख बाबुराव शेळके यांचीही उपस्थिती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा