कुत्रे खरेदी-विक्रीचा व्यवसाय




औरंगाबाद : हडको एन-11 दीपनगर परिसरात नागरी वसाहतीतच एका व्यक्‍तीने कुत्र्यांची खरेदी-विक्री अर्थातच श्‍वानपालन सुरू केले आहे. राहत्या घरातील गज्जीवर पत्र्याचे शेड टाकून हा व्यक्‍ती कुत्र्यांच्या व्यवसाय करतो आहे. मात्र यामुळे संबंधित वसाहतीतील नागरिकांना त्रास होत आहे. कुत्र्यांपासून होणार्‍या त्रासाबाबत नागरिकांनी तक्रार केली असता तो व्यक्‍ती धमक्या देउन अश्‍लील भाषेत शिवीगाळ करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी महापालिकेकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.
शहरातील सिडको परिसरातील हडको एन-11 येथील घर क्रमांक – सी 1/15/6 मध्ये घराच्या दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावर पत्र्याचे शेड टाकून बिपीन जाधव, ज्योती जाधव व यश जाधव या तिघांनी कुत्र्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. मात्र या कुत्र्यांचा वसाहतीतील नागरिक, लहान मुले, वयोवृद्ध या सर्वांनाच विविध मार्गाने त्रास होत आहे. त्यामुळे याबाबत संबंधितावर कारवाई करून न्याय देण्याची मागणी पालिका आयुक्‍त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांना दिलेल्या निवेदनात नागरिकांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सकाळी-सकाळी कुत्रे परिसरात वावरत असल्याने त्यांच्या दहशतीखाली घराबाहेर पडणे देखील नागरिकांना मुश्कील झाले आहे. रात्रीला कुत्र्यांच्या भुंकण्याने झोप उडते, लहान मुले दचकून झापेतून जागी होतात. कुत्र्यांपासून होणार्‍या त्रासाबाबत कुत्र्यांचे मालक बिपीन जाधव व त्यांची पत्नी ज्योती जाधव यांच्याकडे नागरिकांनी तक्रार करत त्यांना समाजावून सांगण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र संबंधितांनी मारण्याच्या धमक्या देत अश्‍लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. यासंबंधीची ऑडिओ क्लीप देखील नागरिकांकडे आहे. कुत्र्यांविषयी बोललात तर तुमच्याविरोधात खोटी तक्रार देउन तुम्हाला जेलमध्ये टाकू, येथे रहायचे असेल तर रहा. नसता घरे विकून दुसरीकडे जा, अशी भाषा बिपीन जाधवकडून वापरली जात असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. निवेदनावर नितीन जाधव, सुनील दांडगे, रावसाहेब जाधव, योगिता जाधव, संगिता ठाकुरे, अनिता इंगळे, वनिता सोनवणे, नम्रता पाटील, छाया सुरवसे, धनश्री वैद्य यांच्यासह वीस जणांच्या स्वाक्षर्‍या आहेत. ही तक्रार सिडको एन-7 पोलीस ठाणे येथेही दिलेली आहे.नागरी वसाहतीत श्‍वान विक्रीची परवानगी दिलीच कशी? : हडको एन-11 येथील घराच्या दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावर पत्र्याचे शेड टाकून म्हणजेच भर नागरी वसाहतीत श्वास विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. आपल्याकडे सर्व परवानग्या आहेत, असा या व्यवसायिकाचा दावा आहे. त्यामुळे स्थळ पाहणी न करताच शासन आणि पालिकेने भर नागरी वसाहतीत हा व्यवसाय करण्याची परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. इमारतीवर शेड टाकून हा व्यवसाय केला जात आहे. ते शेड बांधण्यासाठी सिडको किंवा महापालिका प्रशासनाची परवानगी घेतली होती का? की ते शेडही अनधिकृत आहे? ते शेड अनधिकृत असेल तर मनपा व सिडको प्रशासन त्याविरुद्ध काय कारवाई करणार? असा प्रश्नही येथील नागरिक विचारत आहेत.

पाहणीनंतर कारवाई केली जाईल : कुत्र्यांच्या त्रासासंदर्भात दीपनगर येथील नागरिकांची तक्रार आलेली आहे. त्यानुसार पालिकेचे पथक या भागात आजच पाहणीसाठी गेले आहे. प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित मालकावर योग्य ती कारवाई केली जाईल. नागरिकांच्या तक्रारीत तथ्य असल्यास सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला जाईल.
– शाहेद शेख, प्रभारी मुख्य पशुसंवर्धन अधिकारी, मनपा.

घर हडपण्यासाठी राजकारण : माझ्या भावाचे यात राजकारण आहे. घर हडपण्यासाठी त्याचा हा खोट्या तक्रारीचा प्रयत्न आहे. श्‍वानपालनाच्या व्यवसायासाठी सर्व प्रकारची शासनाची परवानगी माझ्याकडे आहे. शिवाय माझे कुत्रे गल्लीत वावरत नाहीत. ते गच्चीवरच असतात. खाली येतच नाही. कुणाला भुंकतही नाही. आजवर कुणाला चावले देखील नाहीत. मी कुणाला धमक्या, शिवीगाळ केलेली नाही. सर्व आरोप खोटे आहेत.
– बिपीन जाधव, श्‍वान व्यावसायिक.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा