१७जुलैपर्यंत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस




मुंबई : महाराष्ट्रात पावासाला दणक्यात सुरूवात झालेली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील पुढील तीन दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी केला. 17 जुलैपर्यंत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, वाशिम आणि वसई विरारमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे.

रत्नागिरीत धो-धो पाऊस : रत्नागिरी जिल्ह्यात मागील 24 तासात अतिवृष्टी झालेली आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात 104 मिलिमीटर पाऊस पडला आहे. मंडणगड, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर या चार तालुक्यात शंभर मिलिमीटर हून अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात 150 मिलिमीटर हून अधिक पाऊस झाला आहे. रत्नगिरी तालुक्यातील बाव नदी इशारा पातळी बाहेर वहात आहे.

सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच आहे. अधून मधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे. मागील २4 तासात जिल्ह्यात सरासरी 109 मिमी पाऊस पडला आहे. तीन दिवसात जिल्ह्यात सरासरी 371मिमी पावसाची नोंद झालीय. मागील चोविस तासात जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस मालवण व दोडामार्ग तालुक्यात लागला.मालवण मध्ये 157 तर दोडामार्ग मध्ये 150 मिमी पाऊस पडला.तर, सर्वात कमी पाऊस 65 मिमी देवगड तालुक्यात लागला आहे.

जालना घनसावंगीत पूल गेला वाहून : जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अंबड ते घनसावंगी रस्त्यावरील पुल वाहून गेला आहे. त्यामुळे, अनेक गावचा संपर्क तुटलेला आहे. ढालसखेडा जवळील हा पुल वाहून गेल्याने तिर्थपुरी घनसावंगी सह शेकडो गावाचा संपर्क तुटला आहे. जालना जिल्ह्यात काल पासुन काही भागात चांगला पाऊस झाला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा : भारतीय हवामान विभागाने राज्यात 17 जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अदांज व्यक्त केला आहे. तर, पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.

राज्यात पावसाची काय स्थिती…वाचा : हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर, पुणे जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट जारी केलेला आहे. तर सिंधुदुर्ग ठाणे, पालघर, मुंबई आणि धुळेला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जालना, औरंगाबाद लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली, यवतमाळ, अकोला, वाशिम अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरला येलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली लातूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हलका पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा