ऑलिम्पिक खेळाडू अविनाश साबळेंचा मा.आ.भीमसेन धोंडे यांचे हस्ते सत्कार संपन्न




ऑलिम्पिक खेळाडू अविनाश साबळेंचा मा.आ.भीमसेन धोंडे यांचे हस्ते सत्कार संपन्न

आष्टी l (प्रतिनिधी) कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयांमध्ये ऑलिंपिक खेळाडू अविनाश मुकूंद साबळे यांचा जाहिर सत्कार संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.भीमसेनजी धोंडे होते. तर प्रमुख अतिथी भाजपा बीड जिल्हा सरचिटणीस शंकर देशमुख, पत्रकार उत्तम बोडखे, अविनाश साबळेंचे वडील मुकुंद साबळे होते. सर्वप्रथम प्रेरणास्रोत स्व.आनंदराव धोंडे उर्फ बाबाजींच्या प्रतिमेची पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी म्हटले की, आष्टी तालुक्यात खेळाची व खेळाडूची उज्ज्वल परंपरा आहे. आमचे आधारस्तंभ मा.आ.भीमसेन धोंडे साहेब हे ही त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात कुस्ती व कबड्डीचे उत्कृष्ट खेळाडू होते. त्यामुळे त्यांचे खेळाडूंवर विशेष प्रेम आहे. खेळाडू विषयी त्यांना जाणिव आहे. अविनाश मुकूंद साबळे हा आमचे महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचा विद्यार्थी आहे. त्याने टोकिओ जपान ऑलिंपिक स्पर्धेत स्टीपलचेस (अँथलेटिक्स) प्रकारांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. देशाचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कडा आष्टी परिसरात असे गुणी खेळाडू घडावे तसेच साबळेचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर ऑलिंपिक खेळाडू अविनाश साबळे यांचा शाल, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम पंचवीस हजार रुपये व फेटा बांधून मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना अविनाश साबळे यांनी म्हटले की, ऑलिंपिक स्पर्धेनंतर आष्टी तालुक्यात माझ्या काॅलेजने व आदरणीय मा.आ.धोंडे साहेबांनी माझा सत्कार केला याचा मनस्वी आनंद मला होत आहे. आजच्या शैक्षणिक पध्दतीमध्ये खेळाला गौण स्थान आहे. जर खेळाला दुय्यम दर्जा न देता प्रोत्साहन दिले तर ग्रामीण भागातील अनेक खेळाडू तयार होतील. आज शाळेमध्ये खेळाचा तास म्हणजे हासी मजाक करण्यासाठी असतो, खेळाकडे गंभीर दृष्टीने पाहिले जात नाही. जर वैयक्तिक खेळाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिले तर ऑलिंपिकचे एक काय अनेक पदके आपल्या देशाला मिळू शकतात. मी माझ्या खेळाचा सराव आणखी थांबवलेला नाही. २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्यासाठी मी रात्रं-दिवस सराव करत आहे. मा.आ.धोंडे साहेबांनी माझा सत्कार करून प्रोत्साहन पर पंचवीस हजार रुपये रक्कम दिली त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे.
त्यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना मा.आ.भीमसेन धोंडे यांनी म्हटले की, आपल्या आष्टी तालुक्यातील मांडवा बेलगाव सारख्या खेड्यात जन्म घेऊन अविनाश साबळे यांनी ऑलिंपिक स्पर्धेत स्टीपलचेस खेळामध्ये सातवा क्रमांक मिळवला आहे. ही मोठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे. टोकियो येथील स्पर्धेत साबळेंना मेडल मिळाले नाही तरी २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत नक्कीच मेडल मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी अविनाशने भरपूर सराव करावा. आज त्यांना आम्ही प्रोत्साहन पर काही रोख रक्कम दिली आहे. भविष्यात अधिकची रक्कमही देणार आहे. आजच्या तरूणांनी सांघिक खेळाकडे ज्यास्त लक्ष न देता वैयक्तिक खेळाचा सराव करावा. वैयक्तिक खेळामध्ये तरूण पुढे जाऊ शकतात. त्यासाठी मेहनत, चिकाटी व जिद्द असणे गरजेचे आहे असे मा.आ.धोंडे यांनी म्हटले. याप्रसंगी शंकर देशमुख यांचे समुचित भाषण झाले. प्रा.भास्कर चव्हाण यांनी अविनाश साबळे यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.बी.एस. खैरे यांनी तर उपस्थितीतांचे आभार प्रा.डॉ.मुस्ताक पानसरे यांनी मानले. कार्यक्रमास पत्रकार उत्तम बोडखे, प्रा.डॉ.सय्यद जमिर, मुकूंद साबळे, प्रा.मनोज सातपुते, महाविद्यालयील प्राध्यापक, क्रीडाप्रेमी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा