शहर भागात शाळा बंद; खाजगी क्लासेस मात्र सुरू





उमरगा  : शहरात शाळा बंद असल्या तरी, कोचिंग क्लासेस मात्र, बर्‍याच दिवसांपासून धूमधडाक्यात सुरू आहेत. तेव्हा कोचिंग क्लासेसच्या मुलांना कोरोना होत नाही का? असा प्रश्न आता सुज्ञ लोकातून केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोचिंग क्लासेसचे वर्ग धडाक्यात सुरू आहेत. कोचिंग क्लासेसच्या वर्गांना लहान मुलांच्या आई स्वतः घेऊन जाताना दिसत आहेत. हा विरोधाभास पाहून सुज्ञ लोक संभ्रमात पडत आहेत.
गेली 18 महिने महाराष्ट्रातील बर्‍याच शाळा बंद असल्या, तरी देशातील पंधरा राज्यांत व अनेक देशांत लॉकडाऊनचे दिवस वगळता शाळा कमी-अधिक प्रमाणात चालू आहेत. महाराष्ट्रातही योग्य काळजी घेऊन अनेक शाळा सुरू केल्यानंतर मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झालेला नाही. पूर्वतयारी करून शाळा उघडायला प्राथमिक शाळांपासून सुरुवात करावी, अशी शिफारस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे यांनी नुकतीच केली आहे. महाराष्ट्रात शाळा बंद असल्याने झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रचंड नुकसानाबाबत अनेक शिक्षणतज्ज्ञांनी, पालकांनी लक्ष वेधले आहे.
ऑनलाइन शिक्षणामुळे अभ्यासा व्यतिरिक्त सोशल मीडियाची ओढ आणि ऑनलाइन गेम खेळण्याचे प्रमाण वाढले असून, परिणामी कुटुंबातील सदस्यांशी संवाद कमी होत आहे. मुलांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, निद्रेचे बदललेले चक्र, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा वाढून चिडचिड वाढली आहे. गेल्या दीड वर्षांपासून ऑफलाईन शिक्षण पद्धत बंद असल्यामुळे पालक खाजगी शिकवणीला आपल्या पाल्यास पाठवण्यास उत्सुक आहेत. पालक व विद्यार्थ्यांचे कोचींग क्लासेकडे लोंढे वाढल्याने क्लासेस चालकांनी फिसमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. शहरात कोरोना नियम पाळत शाळा सुरू करावी ही मागणी जोर धरू लागली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत घेण्याची सक्ती करू नये. पालकांच्या परवानगी घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जावा. शाळांनी  वर्गातील मुलांची संख्या कमी करण्यासाठी शाळा दोन टप्प्यांत सुरू करता येईल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण झालेले असावे, शाळा सुरू होण्याआधी पालक-शिक्षक संघाची सभा घेऊन याबाबतची माहिती पालकांना द्यावी, बस, रिक्षांतून येताना त्यांच्या खिडक्या उघड्या असाव्यात, शाळा सुरू होताच त्वरित मैदानी खेळ सुरू करू नयेत असे काही नियम शासनाने घालून दिले आहेत.विद्यार्थी मिळविण्यासाठी चढाओढ : ऐकमेकांचे विद्यार्थी ओढण्याकडे कोचिंग क्लास वाल्याचा कल दिसत आहे. पुर्वी क्लासेसच्या वेळा विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार व इतर विषयाच्या क्लासेसच्या वेळेचा विचार करुन खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण दिले जायचे. शैक्षणिक संस्था बंद आहेत. पण शहरात पुन्हा जोमाने खाजगी क्लासेस सुरु झाले आहेत.फिससाठी लावला जातोय तगादा : कोरोनाचा भडका कधी उडेल क्लासेस कधी बंद होतील, याचा भरोसा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या फिससाठी पालकांना तगादा लावला जात आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा