अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम




औरंगाबाद : सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मिठाई, खवा, मावा नमकीन अन्नपदार्थाचा मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात खाद्यतेल, वनस्पती इ. अन्न पदार्थामध्ये भेसळ होण्याची तसेच कमी दर्जाचे अन्न पदार्थ उत्पादन व विक्री होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांना सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनाने अन्न आस्थापनांच्या तपासण्या व नमुने तपासणीसाठी घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही विशेष मोहीम ही डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
मिठाई ट्रे वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा, कच्चे अन्न पदार्थ जसे दुध, खवा, खाद्यतेल, वनस्पती इत्यादी हे परवानधारक, नोंदणीधारक व्यावसायिकांकडून खरेदी करावेत व त्यांची बिले जतन करावीत. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, अन्न पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवावेत. त्वचा व संसर्गजन्य रोगापासून मुक्त या बाबत कामगाराचे वैद्यकीय तपासणी करावी, मिठाई तयार करतांना केवळ फुड ग्रेड खाद्यारंगाचा 100 पी.पी.एम.च्या मर्यादेत वापर करावा. दुग्धजन्य पदार्थाची मिठाई ही 8-10 तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजीग मटेरियलवर
निर्देश देण्यात यावेत.
माशांचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून अन्न पदार्थ जाळीदार झाकणाने झाकून ठेवावे. स्वत:चे आणि कर्मचार्‍यांचे लसीकरण करुन घ्यावे. अन्नपदार्थ तयार करतांना वापरण्यात येणारे खाद्यतेल 2-3 वेळीच वापरण्यात यावे. त्यानंतर ते ठणउज अंतर्गत बायोडिझेल कंपनीना देण्यात यावे. स्पेशल बर्फीचा वापर मिठाई तयार करण्यासाठी करु नये, आदी सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.

ग्राहकांनो, तुम्हीही घ्या काळजी! : मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावे, खरेदी करतांना वापर योग्य दिनांक पाहुनच खरेदी करावी. उघड्यावरील अन्नपदार्थाची खरेदी करु नये. माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो 24 तासाच्या आत करावे, तसेच साठवणूक योग्य तापमानात ठेवावे. मिठाईवर बुरशी आढळण्यास त्याचे सेवन करु नये. चव व वासामध्ये फरक जाणल्यास ती मिठाई नष्ट करावी, आदी सूचना करत ग्राहकांनी अन्नपदार्थ खरेदी करतांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

नियमांचा भंग केल्यास कठोर कारवाई : अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2009 मधील तरतुदीचा भंग केल्याचे आढळल्यास त्यांचे विरुद्ध कठोर कारवाई घेण्यात येत आहे. ग्राहकांनी अधिक माहिती व तक्रारी करण्यासाठी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 किंवा कार्यालयीन दुरध्वनी 0240-2952501 या वर संपर्क करण्याचे आवाहन औरंगाबाद विभागाचे सह आयुक्त (अन्न) उ.श.वंजारी यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा