वर्तमानपत्र आमच्या आयुष्यातील अविभाज्य अंग




 

औरंगाबाद : आज काळ बदलला आहे. प्रिंटसोबत इलेक्ट्रॉनिक मीडियाची सध्या धूम आहे. तरीदेखील आमच्या घरी आजही वर्तमानपत्र नियमाने वाचला जातो. माझे वडील शरद पवार हे सकाळी नियमाने सर्व वर्तमानपत्र बघतात. इलेक्ट्रॉनिक मीडिया असला तरी वर्तमानपत्राचे महत्त्व कमी झालेले नसल्याची भावना खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी व्यक्त केले.
जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन नूतनीकरण उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याचे उद्घाटन खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोमवारी दि.20 सप्टेंबर रोजी करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुरजितसिंग खुंगर, निलेश राऊत तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष अध्यक्ष विनोद काकडे, सचिव विकास राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. फीत कापून भवनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या मनोगतात सुप्रिया सुळे यांनी माध्यमांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. खा. सुळे म्हणाल्या, आज प्रसार माध्यमांची व्याप्ती वाढली आहे. पूर्वी वर्तमानपत्रांशिवाय पर्याय नव्हता. आज टीव्ही चॅनल्स, वेब मीडिया आणि यु ट्यूब पोर्टलदेखील आले आहेत. माध्यमंध्ये तांत्रिक बदल झाले आहेत. वाचनासाठी पर्याय उपलब्ध झाले साले तरी आजही वर्तमानपत्र हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, आमच्या घरी सकाळी 7 वाजता माझे वडील म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सर्वात आधी पेपरचे वाचन करतात. घरी येणारे सर्व पेपर्समधील बातम्या त्या नजरेखालून घालतात. त्यांच्या नंतरच आम्ही पेपर वाचतो आणि महत्त्वाच्या बातम्यांवर चर्चा करतो. वर्तमानपत्र आमच्या आयुष्यातील अविभाज्य अंग असल्याचे त्या म्हणाल्या. प्रास्तविक विनोद काकडे यांनी तर आभार विकास राऊत यांनी मानले. नूतनीकरणासाठी खा. सुप्रिया सुळे व आ. सतीश चव्हाण यांची संघाने आभार मानले. संघाच्या कार्यालयासाठी स्वतःची जागा व पत्रकारांना सदनिकासाठी आपण प्रयत्न करावा अशी विनंती खा. सुळे यांना यावेळी करण्यात आली. यावेळी सर्व माध्यमांचे प्रतिनिधींची उपस्थिती होती.

काही गोष्टी बदलत नाहीत : खा. सुळे म्हणाल्या, बातमी देताना त्याचा दर्जा राखला गेला पाहिजे. आमच्या घरी आजही दूरदर्शनवरील बातम्या आवर्जून पाहिल्या जातात. आमची माती आमची माणसं सारखे कार्यक्रम पाहण्यासाठी वडील (शरद पवार) यांचा आग्रह असतो. त्याचा विशिष्ट दर्जा आहे. बीबीसी, टाइम मॅगझीन यांनीही आपला दर्जा टिकवून ठेवला आहे. पत्रकारिता जबाबदारीने करावी, नवीन टेक्नॉलॉजीमध्ये वावरताना पत्रकारांनी पत्रकारितेचा दर्जा टिकवला पाहिजे. या गोष्टींचे आत्मचिंतन व्हावे. भाषा आणि ज्ञान सुधारण्यासाठी वर्तमानपत्रे असावीत, भाषा, चौकटीत हरवून जाता कामा नये, भाषा टिकली पाहिजे असेही त्या पुढे म्हणाल्या.

नव्या पिढीचा पेपरऐवजी अ‍ॅपकडे कल : खा. सुळे म्हणाल्या, आमची पिढी जरी वर्तमानपत्राकडे ओढ असला तरी नव्या पिढीचा मात्र मोबाईल ऍपकडे कल आहे. ते पेपर वाचत नाहीत. भराभर मोबाईलवरच बातम्या वाचतात. हा तांत्रिक बदल आहे. मात्र आमच्या पिढीच्या हाताला पेपरची शाई जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत पेपर वाचल्याचे समाधान होत नाही. बातम्या संकलनदेखील तांत्रिक प्रगत झाले आहे. वेबसाठी एका हातात मोबाईल स्टिक आणि एका हातात माईक घेऊन सोपी पत्रकारिता होऊ लागली आहे. पुढे त्या म्हणाल्या, 5 मिनिटात 100 बातम्या हा प्रकार योग्य वाटत नाही. विस्तृत बातम्या असल्यास मुद्दा समजण्यास सोपा जातो. इतकी घाई कशाला असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. बातमीदार जे दाखवतो त्याचा समाजमनावर परिणाम होत असतो. म्हणून, बातमीदाराने जबाबदारीने वृत्तांकन करण्याचे आवाहनही त्यांनी पत्रकारांना केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा