मराठवाड्यात अतिवृष्टी; उस्मानाबाद मध्ये 16 शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरने काढले




*उस्मानाबाद : १६ शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरने काढले..*

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून पावसाने सरासरी आेलांडली आहे. सोमवारी रात्रीतून व दुसऱ्या दिवशी पहाटे झालेल्या पावसामुळे सौंदणा, वाकडी व दाऊतपूर येथील शेतकऱ्यांच्या घरांना पाण्याने वेढले. मंगळवारी दाऊतपूर व सौंदणा येथील १६ जणांना एनडीआरएफच्या पथकाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने, तर वाकडी येथील १७ जणांचे प्राण जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने बोटीच्या साहाय्याने वाचवले. तसेच ४३९ जणांना सुरक्षित स्थळी शाळेत हलवले.

*नांदेड : पुरात अडकलेल्या चार जणांची सुटका..*
नायगाव तालुक्यातील टाकळी (बु.) येथील बंधाऱ्यात मंगळवारी चार जण अडकले होते. अग्निशमन दल शोध व बचाव पथक( बोट, रेस्क्यू रोप , तराफा ई. ) साहित्यासह घटनास्थळी पोहोचले. बंधाऱ्याच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह फार जास्त प्रमाणात होता. प्रथम वेळी बोट घेऊन पथक त्या चारही व्यक्तीपर्यंत पोहोचले. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

*बीड : देवळा आणि आपेगावच्या ७७ जणांना वाचवले*
अंबाजोगाई | मांजरा धरणाचे दरवाजे उघडल्याने अंबाजोगाई तालुक्यातील देवळा-अकोला रस्त्यावरील सारसा शिवाराला पुराचा वेढा बसला व येथील ५८ महिला, पुरुष अडकले होते तर आपेगाव शिवारात पुराचे पाणी शिरल्याने अर्धे गाव पुरात सापडले होते. त्यात १९ शेतकऱ्यांसह सालगडी अडकले होते. एनडीआरएफच्या तुकडीतील जवानांनी एकूण ७७ जणांना वाचवले.

पुराच्या दोन्ही ठिकाणी एनडीआरएफच्या दोन बोटी दाखल झाल्या. सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्यासह भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी पुराची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून तातडीने मदत उपलब्ध केली. युवकांनीही बचावकार्यात सहभाग घेतला.

*पैठण : पैठण शहरात घराची पडझड, चिमुकली झाली ठार*
पडझडच्या मराठवाड्यात घटना घडल्या. यात घराची भिंत काेसळल्याने पैठण शहरातील कहारवाडा येथे अंजू कृष्णा गव्हाणे (६) या चिमुकलीचा मृत्यू झाला. शिवाय बसस्थानक चौकातील सूर्या हाॅटेलच्या मागील भागातदेखील भिंत कोसळली. मात्र यात जीवितहानी झाली नसल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.

*नांदेड : पुरात वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला..*
हदगाव तालुक्यातील निवघा येथील चांदू मसाजी कांबळे (६०) हे मंगळवारी (ता.२८) सकाळी ८ ते ८.३० च्या सुमारास आपल्या शेळ्या घेऊन चारण्यासाठी गेले असता नाल्याच्या पुरात वाहून गेले. त्यांचा मृतदेह लगतच असलेल्या तलावात आढळून आला. घटना माहीत मिळताच निवघा येथील सरपंच शरद कदम यांच्यासह शंकर पाईकराव अमोल पाईकराव, पंजाबराव कांबळे यांनी शोध घेतला आहे.

*जालना : पावसामुळे जीर्ण भिंत कोसळली, एकाचा मृत्यू..*
पावसामुळे जीर्ण झालेली भिंत कोसळून झोपेत असलेल्या एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरातील भीमनगर भागात सोमवारी मध्यरात्री घडली. परशुराम दशरथ म्हस्के असे मृताचे नाव आहे. भिंत कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी भिंत बाजूला करून त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जालना शहरात अनेक इमारती व भिंती जीर्ण झालेल्या आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा