पैठण : औरंगबाद जिल्ह्यात पाऊसाचे थैमान सुरूच असून जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी 1 ऑक्टोबर रोजी रात्री जोरदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. धरण प्रशासनाने शनिवार दि.2 ऑक्टोबर रोजी  सकाळी 7 वाजता धरणाचे आपात्कालीन दरवाजे 1 ते 9 दीड फुटाने उचलण्याचा निर्णय घेतला त्यामुळे धरणातून गोदापत्रात 89 हजार क्यूसेक विसर्ग करण्यात आला.
यावेळी गेट क्र. 1 ते 9 असे एकुण 9 गेट 0 फुटावरुन दीड फुट उंचीवर उघडण्यात आले.  अशाप्रकारे 14 हजार 148 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदी पात्रात वाढवुन 89 हजार 604 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच 1 ते 18 गेट हे चार फूट उचलण्यात आले होते.

नाथसागरावर पर्यटकांची तोबा गर्दी : नाथसागराच्या गेट मधून पाणी पडतानाचे दृश्य बघण्यासाठी आज दिवसभर पर्यटकांची तोबा गर्दी दिसून आली. त्यामुळे पोलीस प्रशासनाला गर्दी आवरताना नाकी नऊ आल्याचे दिसून आले. दरम्यान पर्यटकांच्या गर्दीने पैठण व नाथसागराकडे जाणारे रस्ते फुलून गेले. तसेच पर्यटक वाढल्याने रिक्षाचालक,हॉटेल व्यवसायीक खारे फुटानेवाले तसेच हातगाडी वर फळ विक्री करणार्‍यांचा चांगला धंदा झाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. विशेष म्हणजे कोरोना काळा नंतर प्रथमच पैठण शहरात एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार ,उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे ,उपनिरीक्षक गुटकूळ वाहतूक शाखेचे सुधीर ओव्हळ, मुकुंद नाईक यांनी जातीने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी दक्षता घेत बंदोबस्त केला.

तीन दिवसात 11 टीएमसी पाण्याचा विसर्ग : 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता धरणाचे 4 दरवाजे उघडून गोडापत्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता. आवक वाढल्याने नंतर टप्याटप्याने धरणाचे 10ते 27 क्रमांकाचे 18 दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर 1 लाखापेक्षा अधिक आवक होताच धरण प्रशासनाने आपत्कालीन 1 ते 9 दरवाजे दोनदा उघडले दरम्यान गेल्या 65 तासात जायकवाडी धरणातून 11 टीएमसी पाणी गोदावरीत विसर्ग करण्यात आल्याची माहिती सहायक अभियंता ज्ञानोबा शिरसाट यांनी दिली आहे.

दुसर्‍यांदा आपत्तीकालिन दरवाजे उघडले : धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा दुसर्यांदा आपत्तीकालिन दरवाजे उघडावे लागले दरम्यान दिवसभर पाण्याची आवक कमी अधिक होत असल्याने विसर्ग कमी अधिक करण्यात येत होती शनिवार  संध्याकाळी 7 वाजता  धरणाची पाणीपातळी 1521.70 फुटामध्ये तर 463 .814 मीटर असून धरणाची टक्केवारी 98.35 टक्के नोंद घेण्यात आल्याची माहिती धरण नियंत्रण कक्षाचे ज्ञानोबा शिरसाट यांनी दिली.

अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन : संभाव्य पूर परिस्तिथी पाहता जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धरण अभियंता विजय काकडे, सहायक अभियंता ज्ञानोबा शिरसाट, शाखा अभियंता बी. वाय अंधारे, तांत्रिक सहायक गणेश खराडकर हे परिस्तिथी वर लक्ष ठेवून आहेत. धरणातील वाढत्या पाणीपातळीमुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कचे इशारा तालुका प्रशासनाने दिला आहे. अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे धरण प्रशासनाने गेल्या चार दिवसांपासून धरणातुन गोदापात्रात पाणी सोडणे सुरु ठेवले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा