इनामी जमीन बोगस खालसाप्रकरणी जिल्ह्यात एकाच ठिकाणी कारवाई; इतर ठिकाणी का नाही? – जिल्हाध्यक्ष अशोक येडे




 

सर्वत्र कारवाई करा अन्यथा आंदोलन; आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा

बीड (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यात इनामी बोगस खालसा जमिनी प्रकरणी एकाच ठिकाणी कारवाई करून प्रशासनाने दुजाभाव केलेला आहे. जिल्ह्यातील सर्वच बोगस खालसा जमिनीप्रकरणी तात्काळ कारवाई करा अन्यथा आम आदमी पार्टी आंदोलन करेल असा इशारा जिल्हाधिकारी यांना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी जिल्हा सचिव रामधन जमाले, बीड शहराध्यक्ष सय्यद सादेक यांची उपस्थिती होती.

प्रकाश आघाव हे उपजिल्हाधिकारी सा. बीड या पदावर रुजू झाल्यापासून बीड जिल्ह्यातील मौजे बीड तरफ पिंगळे येथील शहेनशहावली दर्गाची १४५ एकर जमीन, माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील ३५० एकर जमीन, गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील शहेनशाहवली दर्गाची ४५० एकर जमीन, तळेगाव (परळी तालुका) ५६ एकर, बेलखंडी (पाटोदा) येथील गोसावी मठाची २५ एकर जमीन, शेपवाडी(ता अंबेजोगाई) येथील ६१० एकर जमीन बोगस खालसा करण्यासह धारूर तालुक्यातील ९५ एकर जमीन स्वतः खरेदी करून नातेवाईक व मित्रांच्या नावे करण्यात आल्याचे कळते असून अशाप्रकारे जिल्ह्यातील १० हजार एकर इनामी जमीनी हडपण्याचा डाव रचला गेला असून त्याबाबत तात्काळ चौकशी समिती नेमून श्री प्रकाश आघाव यांच्यावर कडक कारवाई करावी. एकदोन ठिकाणच्या कारवाई करून सामान्य जनतेला वेड्यात न काढता जिल्ह्यातील सर्वच बोगस खालसा केलेल्या इनामी जमिनींबाबत कारवाईचा दणका देण्यात यावा अन्यथा आम आदमी पार्टी, बीड जिल्ह्याकडून येत्या सोमवारी १० हजार एकर इनामी जमीन बोगस खालसा करण्याच्या या प्रकाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आम आदमी पक्षाकडून निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा