ताई भक्तांनाही दोन वर्षापासून बोलायचंय! ब्रम्हगाव ते सावरगाव घाट रस्त्यावर ओतलेले चार कोटी कोणी गिळले?




निकृष्ठ रस्त्याबाबत पंकजाताईंनी मौन सोडण्याची डॉ.गणेश ढवळे यांची मागणी
 । बीड । दि. 14 :गेल्या दोन वर्षांमधल्या खूप गोष्टी मनामध्ये साठलेल्या आहेत. तुमचंही ऐकायचंय, मलाही बोलायचं आहे, असं म्हणत पंकजाताई मुंडे यांनी सावरगाव घाट येथे होणार्‍या मेळाव्याला येण्याचं अवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. दरम्यान सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केल्यानंतर पंकजाताईंनी या गावाला जोडणारे सगळ्या रस्त्यांवर कोट्यावधीचा निधी टाकून मंत्री असतानाच्या काळातच ते करवून घेतले. मात्र दोन वर्षातच या रस्त्याची काय अवस्था झाली हे देखील एकदा पंकजाताईंनी आपल्या उघड्या डोळ्यांनी बघावे. ब्रम्हगाव- मुगगाव- सावरगाव घाट या रस्त्यावर पंकजाताईंनी थोडा-थोडका नव्हे तर 4 कोटी 43 लाख रुपयांचा निधी ओतला आहे. आता हा निधी नेमका कुणी गिळला याचा शोध पंकजाताईंनी घेऊन संबंधीत ठेकेदाराचे कान पिळून रस्ता पुन्हा करवून घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी सावरगावघाट (भक्तिगड) येथिल भक्तांची सोय व्हावी म्हणून आ. सुरेश धस यांच्या विनंतीवरून ब्रम्हगाव -मुगगाव -सावरगावघाट या रस्ता दुरूस्तीसाठी 4 कोटी 43 लाख रूपयांचा निधी मंजूर करून दिला. परंतु हे काम ज्या कार्यकर्त्याला दिले तो तर बोगसच निघाला पण त्यानं रस्ता देखील अत्यंत बोगस करून संपूर्ण निधी हडपण्याचं काम केलं. सावरगाव घाट हा आता पंकजाताई यांच्या जिव्हाळ्याचा विषय, पंकजाताईंच्याच कार्यकर्त्याने हा रस्ता करताना एवढी नितीमत्ता का सोडली? हा रस्ता किमान पाच वर्षे तरी टिकायला हवा होता. मात्र केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात रस्त्याचा पोपडा झाला आहे. पैठण-पंढरपूर या महामार्गाची डॉ.ढवळे यांनी पोलखोल केल्यानंतर पंकजाताईंनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना ट्विट करीत त्यांना असले काम आवडणार नाही, असे म्हटले. मग आता सावरगाव घाटच्या या रस्त्याचे काम ढळढळीत निकृष्ठ दर्जाचे झालेले असताना पंकजाताई ते आवडले का? असा सवाल डॉ.ढवळे यांनी केला आहे. हा रस्ता इतका खराब करणे म्हणजे लाखो भक्तांच्या काळजाला ठेस लागण्यासारखे आहे. संबंधीत ठेकेदारावर कारवाई न झाल्यास वेगळ्या आंदोलनाचा विचार करावा लागेल असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे  यांनी दिला आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा