माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांमुळे शेतकर्‍यांचा होणार कायापालट गोड सीताफळ आणि मुलायम रेशीमला मिळाली हक्काची बाजारपेठ




 

बीड । शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळणे अवघड जाते. बीड जिल्ह्यात सिताफळ उत्पादक तसेच रेशीम कोष उत्पादक शेतकर्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील गोड सीताफळ आणि मुलायम रेशीमला आता हक्काची बाजारपेठ मिळाल्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. याच वेळी 5 कोटी खर्चाचे मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत सीताफळ प्रक्रिया प्रकल्पाचे भूमीपूजन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले.
कृषी उत्पन्न बाजार समिती बीड, रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त रेशीम कोष खरेदी-विक्री बाजार पेठेचा व सिताफळ प्रक्रिया सुविधा केंद्राचा शुभारंभ शनिवारी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते व माजी मंत्री बदामराव पंडित, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बाजार समिती बीड येथे संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर रेशीमचे उपसंचालक दिलीप हाके, जिल्हा रेशीम अधिकारी विणीत पवार, उपनिबंधक गोपाळकृष्ण परदेशी, बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, सत्यनारायण लाहोटी, विलास बडगे, जगदिश काळे, गणपत डोईफोडे, परमेश्वर सातपुते, चंद्रकांत सानप, अरुण डाके, अरुण बोंगाणे, नानासाहेब काकडे, बद्रीनारायण जाजू, जवाहरलाल कांकरिया, अशोक शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले की, बाजार समितीमध्ये रेशीम उत्पादक शेतकरी आणि सीताफळ उत्पादक शेतकर्‍यांसाठी उभारण्यात येत असलेले प्रकल्प शेतकर्‍यांना दिलासा देणारे आहेत. काही गावात तर 90 टक्के शेतकरी रेशीम उत्पादन करू लागले आहेत. जिल्ह्यात शिताफळ उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतकर्‍यांना कवडीमोल दराने आपला माल विकावा लागतो ही बाब लक्षात घेऊन सीताफळ प्रक्रिया प्रकल्प उभारत आहोत तसेच रेशीम कोष खरेदी विक्री ही बाजारपेठ आजपासून सुरू करत आहोत. बीडचा रेशीम कोष दर्जेदार आहे, आमच्या शेतकर्‍यांना सुलभ व हक्काची बाजारपेठ मिळावून दिली आहे. सोमवार ते शुक्रवार ही बाजारपेठ सुरू राहील, एका वर्षात 750 टन रेशीम उत्पादन करणारा बीड जिल्हा सध्या एक नंबर वर आहे. बीडचा शेतकरी काबाडकष्ट करून उत्पादन करतो पण बाहेर जिल्ह्यात त्याला योग्य भाव मिळत नाही म्हणून मार्केट कमिटीच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. बीड तालुका दूध संघाच्या माध्यमातून हिवरा पहाडी व लोळदगाव या दोन ठिकाणी दूध संकलन केंद्र सुरू केले आहे. रायमोहा येथे गजानन बँकेची शाखा सुरू केली असून आणखी चौसाळा येथे एक नवीन शाखा सुरू करत आहोत. लवकरच रेशीम कोष वर प्रक्रिया करणारा उद्योग उभारण्यात येईल या सर्व बाबी जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार आहेत. शेतकर्‍यांना मदत व्हावी यासाठी जिल्ह्यातील कुठलेही महसूल मंडळ न वगळता सर्वच महसूल मंडळातील शेतकर्‍यांना मदत मिळाली पाहिजे ही आग्रही मागणी आपण केली आहे. आष्टी तालुक्यातील एक महसूल मंडळ वगळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे ती वगळण्यात येऊ नये असे ते म्हणाले. सोलापूर-धुळे मार्गावर बीड-माजलगाव आणि बीड ते परळी या दोन ठिकाणी स्लिप रोड महत्त्वाचे आहेत तसेच मिनी बायपासचे कामही पूर्ण व्हावे यासाठीदेखील आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. पारदर्शकता असायला हवी ती जपण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आज भाऊबीज आहे आणि याच दिवशी रेशीम प्रक्रिया करणारी सूतगिरणी उभारण्याची संकेत त्यांनी दिले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, व्यापारी असो की शेतकरी यांच्या हिताचे निर्णय घेऊन आण्णांनी प्रकल्प उभे केले आहेत. बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी विक्री पेठ होणे महत्त्वाचे होते. रेशीम उद्योग शेतकर्‍यांना हा मोठा दिलासा आहे, उत्पादन आहे पण बाजारपेठ नाही असे असेल तर उत्पादन वाया जाते. बीडची मार्केट कमिटी ही राज्यात आदर्श निर्माण करत असून सत्तेसाठी जनतेची दिशाभूल कधीच केली नाही. जनतेचा विश्वास आहे म्हणूनच सातत्याने प्रतिनिधित्व करण्याची संधी आम्हाला मिळते. लोकशाही मार्गाने जनतेतून निवडून दिल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे असते स्वतःचा आणि बगलबच्चे यांचा विकास करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेले नाही. आम्ही कामे करतो, जनतेत राहतो त्यामुळेच लोक आमच्यावर प्रेम करतात म्हणूनच आम्ही प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सांगून रेशीम कोष खरेदीमुळे शेतकर्‍यांना बाहेर राज्यात जाऊन रेशीम कोष विक्री करावा लागत होता, ज्यामुळे जाण्याचा खर्च व वेळ, माल खराब होणे हा प्रकार घडत होता. त्यामुळे अशा खरेदी-विक्री केंद्राची गरज होती जी आज आण्णांच्या माध्यमातुन पूर्ण झाली. शेतकर्‍यांना आता याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येईल व याला चांगला भाव देखील यामुळे प्राप्त होणार आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांना आज दिनांक 7 रोजी स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले. यावेळी रेशीम उद्योग शेतकरी महेश शिंगण, कालिदास नवले, दिलीप हाके उपसंचालक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास रेशीम उत्पादक शेतकर्‍यांसह रामनगर (कर्नाटक), भंडारा, परळी, रूई, पांगरी, वरपगाव, होळ, सांगली, अंबेजोगाई, तेरखेडा, वडगाव ढोक, मुरूड येथील तसेच राज्यासह बाहेर राज्यातून व्यापारी रेशीम खरेदीसाठी उपस्थित राहिले होते. यावेळी धनंजय जगताप, अच्युतराव मोरे, श्रीमंत सोनवणे, शेळके, विशाल बोबडे यांच्यासह बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, व्यापारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार मितीचे सभापती दिनकर कदम यांनी केले तर सुत्रसंचालन श्रीराम जाधव यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार उपसभापती गणपत डोईफोडे यांनी मानले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा