साधेपणाने व नियमांचे पालन करून घरच्या घरीच सण साजरे करू – ना. मुंडे




साधेपणाने व नियमांचे पालन करून घरच्या घरीच सण साजरे करू – ना. मुंडे

परळी प्रतिनिधी :- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीया, मुस्लिम समाजातील अत्यंत महत्व असलेल्या रमजान ईदच्या तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना ‘कोरोनावर विजय मिळवला तोच दिवस सध्याच्या काळात सर्वात मोठा शुभ मुहूर्त व सर्वात मोठा उत्सव असेल’, असे मत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

अक्षय तृतीया, रमजान ईद तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

साडेतीन मुहूर्तांपैकी महत्वाचा मुहूर्त समजल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयाच्या निमित्ताने नवीन कार्याची सुरुवात, आप्तेष्ट – नातेवाईकांसोबत आंब्याच्या रसाचा आस्वाद घेण्याची आपली परंपरा आहे. परंतु या वर्षी कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करून साधेपणाने अक्षय तृतीयाचा सण घरच्या घरी साजरा करावा असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

उद्या राज्यासह जगभरात मुस्लिम समाजात रमजान ईद साजरी होत आहे. रमजानची पवित्र नमाज अदा करताना मुस्लिम बांधवांनी जगावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी अल्लाहकडे दुवा मागावी. रमजान ईद निमित्ताने एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्याचे टाळून सोशल माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात व शासकीय नियमांचे पालन करावे, असेही ना. मुंडे यांनी म्हटले आहे.

समाजाला धर्म-जातीयवादाचा पगडा तोडून त्याबाहेर येऊन मानवतावादी विचारांची शिकवण देणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांची जयंती ही दरवर्षी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. परंतु यावर्षी शासकीय निर्बंधांचे पालन करून महात्माजींच्या विचारांचे पाईक होऊन त्यांना जयंतीनिमित्त घरूनच अभिवादन करू, असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा