अदानी ग्रुपला टक्कर देणारा बीडचा कुटे ग्रूप !




अदानी ग्रुपला टक्कर देणारा बीडचा कुटे ग्रूप

बीडच्या सुरेश कुटे, अर्चना कुटे उद्योजकाचा देशभरात डंका

बीड ।

मागास जिल्हा म्हणत न्युनगंड निर्माण करून न घेता नशिबाला दोष न देता मोठी स्वप्न पाहत ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी रात्रंदिवस धडपड करत अवघ्या आठ वर्षात जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत आपले साम्राज्य उभे करून अदानी ग्रुपला टक्कर देण्याची हिंमत ठेवणार्‍या बीडच्या सुरेश कुटे, अर्चना कुटे या उद्योजकाचा देशभरात डंका वाजत आहे. चार प्रॉडक्ट निर्मितीच्या माध्यमातून 30 हजार तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार्‍या बीडच्या कुटे ग्रुपची वाटचाल नक्कीच थक्क करणारी आहे.

बीड जिल्ह्यासारख्या अवर्षणग्रस्त आणि मागास जिल्ह्यात ना उद्योग, ना हाताला काम, ऊसतोड कामगारांचा जिल्हा हिच खरी ओळख. मात्र ही ओळख पुसण्याचे काम बीडमधील सुरेश कुटे या तरूणाने केले आहे. अत्यंत साधी राहणी, उच्च शिक्षित, अंगात नम्रता आणि कामाचा धडाका या बळावर सुरेश कुटे यांनी बीडचे नाव संपूर्ण देशामध्ये निर्माण केले आहे. पंधरा वर्षापूर्वी वडिलोपार्जित असणार्‍या बीड शहरातील हिरालाल चौकात राधा क्लॉथ सेंटर या साध्या कपड्याच्या दुकानात मदत करणार्‍या या तरूणाने बाहेरचे जग बघितले. चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार नाही हे ओळखले. आणि आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी ज्ञानराधा ग्रामीण बिगर पतसंस्था उघडली. मराठवाड्यातील ही पहिली अर्बन सोसायटी ठरली. या पतसंस्थेचे रूपांतर पुढे ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये झाले. या मल्टीस्टेटच्या देशभरात आज 48 शाखा आहेत.
ही मल्टीस्टेट स्थिर झाल्यानंतर सुरेश कुटे यांनी आपली पत्नी अर्चना कुटे यांच्या सहकार्याने एक एक पाऊल पुढे टाकण्यास सुरूवात केली. पहिल्यांदा बीडमध्ये ऑईल मिल्स स्थापन करून तेलाचे उत्पादन घेतले. उपपदार्थ म्हणून पेंड निर्मितीही सुरू केली. तीच पेंड निर्मिती आज देशातील पहिली बॅन्डींग कंपनी झाली आहे. सहा वर्षापूर्वी सुरेश कुटे यांनी कुटे ग्रुप स्थापन करून तिरूमला ऑईल निर्मितीमध्ये पाऊल ठेवले. काळाची पावले ओळखत स्वंत:ची ट्रान्सपोर्ट कंपनी स्थापन केली. ज्या कंपनीत आज पाच हजार गाड्यांचा
समावेश आहे. तिरूमला ऑईलने देशभरात आपली ओळख निर्माण केली. जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशभरात तिरूमला ऑईलला मोठी मागणी आहे.
बीड आणि गंगापूर या दोन ठिकाणी मिळून रोज 750 टन ऑईल निर्मिती केली जाते. आदानी ग्रुपच्या अदानी विलमर या ऑईल निर्मिती करणार्‍या कंपनीला टक्कर देण्याची किमया तिरूमलाने साधली. आदानी विलमरच्या फॉर्च्युन आणि कुटे ग्रुपच्या तिरूमला या दोन कंपन्यातील उत्पादनाची तफावत फार राहिली नाही. फॉर्च्युनपेक्षा तिरूमलाच्या तेलाला देशभरात मोठी मागणी आहे. खाद्यतेल निर्माण करणार्‍या कुटे ग्रुपने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. अलिकडच्या काळात कुटे ग्रुपने अनेक उद्योगांमध्ये पाऊल टाकले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तब्बल 39 कंपन्या कार्यरत आहेत. देशभरातील प्रत्येक मेट्रोसिटीत कुटे ग्रुपचे अद्यावत कार्यालय आहे. 30 हजार तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यातील 20 हजार तरूण हे बीड जिल्ह्यातील आहेत. दुर्गम आणि ग्रामीण भागात लहानाचा मोठा झालेल्या सुरेश कुटे या तरूणाने आपले विश्व निर्माण केले. एक मराठी माणूस उद्योग क्षेत्रात उतरून बीड जिल्ह्यासह मराठवाड्याची संपूर्ण देशात ओळख निर्माण करून देत आहे.
प्रत्येक पाऊल यशस्वी ठरले 


कुटे ग्रुपच्या तिरूमला ऑईलने देशभरात नावलौकीक मिळवल्यानंतर त्यांनी कुटे ग्रुपचे गुडमॉर्निंग दूध उत्पादन सुरू केले. फलटण आणि तीसगावमध्ये प्लँट उभे करून एक हजार दूध संकलन केंद्रातून लाखो लिटर दूध खरेदी केले जात आहे. यावर प्रक्रिया करून दूध, तूप, दहि, लस्सी, ताक, दूध पावडर असे उपपदार्थ निर्मिती होत आहेत. कुटे ग्रुपच्या गुड मॉर्निंग प्रोडक्टला मिळालेल्या यशानंतर कुटे ग्रुपने पेंडीच्या व्यवसायात पाऊल टाकले. देशातील पेंड व्यवसायातील पहिला ब्रँड म्हणून नावलौकीक मिळवत तिरूमला पेंड उत्पादन बाजारात आणली.
अदानीनंतर पॅराशुटला टक्कर
अदानी ग्रुपच्या फॉर्च्युन या खाद्यतेलाला टक्कर देत कुटे ग्रुप हेअर ऑईलमध्ये उतरला. तिरूमला हेअर ऑईल निर्मिताचा बीडमध्ये प्लँट उभा करून 26 राज्यामध्ये आपलं बस्तावन बसवलं. हेअर ऑईलचे पाच उपनिर्मिती प्रकल्प उभे केले. हेअर ऑईलमध्ये दबदबा असणार्‍या पॅराशुट हेअर ऑईलला टक्कर देण्याचे काम तिरूमला हेअर ऑईलने केले.
आता लक्ष्य रिलायन्स
आपला प्रत्येक प्रयोग यशस्वी होत असल्याचे पाहून कुटे ग्रुप आता रिलायन्सला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लवकर कुटे ग्रुप टेक्सस्टाईल मार्केटमध्ये उतरत आहे. बीड जिल्ह्यातील निर्माण होणारा कापूस बीड जिल्ह्यातच खरेदी करून या कापसापासून धागा तयार करत कापड निर्मिती केली जाणार आहे. लवकरच कुटे ग्रुपचा शेअर्स मार्केटमधील आयपीओही लाँच होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा