माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा राजकीय विरोधकांचा डाव – अमर नाईकवाडे




माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा राजकीय विरोधकांचा डाव – अमर नाईकवाडे

बीड ।

माझे राजकीय विरोधक त्यांच्या राजकीय अस्थैर्यामुळे, सूड भावनेने, सत्तेचा दुरुपयोग करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत आहेत. खोटे गुन्हे दाखल करण्याकामी ते महिलांचाही वापर करू शकतात. मला खून, खुनाचा प्रयत्न, ॲट्रॉसिटी तसेच बलात्कारासारख्या घाणेरड्या आरोपात गोवण्याचा षड्यंत्र विरोधकांकडून सुरू आहे. माझ्या विरोधात कसल्याही प्रकारची तक्रार आल्यास पूर्ण शहानिशा करूनच पुढील कार्यवाही करावी, यासाठी मी मा. जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून रीतसर निवेदन देणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून समाजहित डोळ्यासमोर ठेवून माझं सामाजिक व राजकीय मार्गक्रमण सुरू आहे. लोकहिताशी तडजोड न केल्यामुळे प्रसंगी मला राजकीय भूमिका देखील बदलावी लागली. माझ्या भूमिकेत सत्यता असल्यामुळे मला मिळत असलेला बीड शहरातील लोकांचा वाढता पाठिंबा पाहता माझे राजकीय विरोधक हवालदिल झालेले आहेत. विरोधकांवर पुराव्यानिशी आरोप केल्यामुळे कशाही प्रकारे मला नामोहरम करायचेच असा चंग त्यांनी बांधलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून राजकीय विरोधकांनी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करत मला खिंडीत गाठण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. यासंदर्भात मी व माझ्या सहकाऱ्यांनी पूर्वी मा. जिल्हा पोलीस अधिक्षक, बीड यांच्याकडे दि. 14/6/2021रोजी तक्रार देखील दिलेली आहे. विरोधकांनी कितीही सत्तेचा दुरुपयोग करून मला माझ्या भूमिकेपासून बाजूला सारण्याचा प्रयत्न केला तरी मी अशा दबावाला भीक घालणारा कार्यकर्ता नाही असेही शेवटी अमर नाईकवाडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा