15 वर्षांच्या मुलीचा विवाह; सासरी येताना नजर चुकवत तिने गाठले पोलीस ठाणे




15 वर्षांच्या मुलीचा विवाह; सासरी येताना नजर चुकवत तिने गाठले पोलीस ठाणे
आई-मामा, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
बीड : वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी बळजबरीने तरुणाशी विवाह लावून दिला. सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या सासऱ्याची नजर चुकवून तिने बसस्थानकातून थेट पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांना आपबीती सांगितली.
आई, मामा, पती व सासरा हे यात आरोपी आहेत. अधिक माहिती अशी की, जळगाव येथील 15 वर्षीय मुलीच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी तिचा विवाह पाटोदा तालुक्यातील एका तरुणाशी ठरवला होता. मात्र, तिच्या आई व मामा यांनी ती अल्पवयीन असतानाही त्या तरुणाशी विवाह लावून दिला. लग्नानंतर तिने पती पसंत नसल्याचे सांगून मला माहेरी घेऊन जा, अशी विनंती आई आणि मामाकडे केली. त्यामुळे त्यांनी तिला जळगावला परत आणले. 23 जुलै रोजी तिचा सासरा घेण्यासाठी आला. सासरी निघालेल्या मुलीने जळगाव बसस्थानकातून सासऱ्याची नजर चुकवली व दुसऱ्या बसने अंबडला पोहोचली. अंबड पोलिसांनी स्थानकात पोहोचून तिला धीर दिला. तिच्या तक्रारीवरून आई, मामा, पती आणि सासऱ्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदविला आहे. हा गुन्हा पाटोदा पोलिसांकडे वर्ग झाला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी दिली. आई, मामा, पती व सासरा यांच्यावर गुन्हा नोंदविल्यानंतर या मुलीला जवळच्या कोणत्याही नातेवाईकाचा आधार नाही. त्यामुळे तिला जालना येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा