गुलाबी थंडीत बहरला चिमुकल्यांच्या कलाविष्कार..! दिंद्रुडच्या व्यंकटेश पब्लिक स्कुलचे स्नेहसंमेलन साजरे




गुलाबी थंडीत बहरला चिमुकल्यांच्या कलाविष्कार..!

दिंद्रुडच्या व्यंकटेश पब्लिक स्कुलचे स्नेहसंमेलन साजर

दिंद्रुड दि.11 (प्रतिनिधी) :- पौर्णिमेची चांदणी रात्र, प्रेक्षक व महिला पालकांनी तुडुंब भरलेले शाळेचे प्रांगण, आणि त्यात गुलाबी थंडीत बहरलेला चिमुकल्यांचा कलाविष्कार..! अशी अनोखी सांस्कृतिक पर्वणी दिंद्रुडकरांना अनुभवायला मिळाली. निमित्त होते व्यंकटेश पब्लिक स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे. विविध कलागुणांचे प्रदर्शन करत पूर्वप्राथमिक ते पाचवीच्या बालगोपाळांनी पालक व उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
माजलगाव तालुक्यातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुढे येत असलेल्या दिंद्रुड येथील व्यंकटेश पब्लिक स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच साजरे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सीईओ बंडू खांडेकर होते. तर उदघाटक म्हणून नखाते उपस्थित होते. प्रा.डॉ.रमेश गटकळ, सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील डाके, सरपंच बाबुराव सुरवसे, त्रिंबक साबळे, हभप उद्धव महाराज ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर पुण्याहून पोद्दार इंटरनॅशनल स्कुलच्या रेखा तौर यावेळी आवर्जून उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष प्रदीप ठोंबरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात विठ्ठल नामाचा गजर करत निघालेली पारंपरिक दिंडी प्रेक्षकांचे आकर्षक ठरली. सोशलमीडियाचा होत असलेला गैरवापर व मोबाईल वापराचा अतिरेक यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली मूकनाटिका अनेकांना भावली. महाराष्ट्राची लोककला असलेली ‘लावणी’, समूहनृत्य, शेतकरी गीत, भक्तिगीते, गवळणी, भारुड कोळीगीत आदींचे सादरीकरण करुन बालकांनी उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती शिवाजीमहाराज व अफजलखान यांच्या भेटीचा पोवाडा भाव खाऊन गेला. एकंदरीत, आपण ग्रामीण संस्कृती व सांस्कृतिक ठेवा जपला पाहिजे असा संदेश चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारातून दिला. विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजिंक्य ठोंबरे, अनुश्री यादव, यशश्री सोळंके, विराज ठोंबरे, गौरव सोळंके, नंदीनी दहिफळे या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमातुन मनोरंजनासोबतच समाजप्रबोधन होते,त्यामुळे अशा कार्यक्रमांची गरज आहे. व्यंकटेश पब्लिक स्कुल नेहमीच समाजाभिमुख व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर देत असल्यामुळे ही बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. ही शाळा शिक्षणासोबतच कला, क्रीडा व नैतिकमुल्यांवर भर देत असल्याचे प्राचार्य प्रदीप देशमाने यांनी प्रस्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबीर कराडो यांनी तर आभार नितीन ठोंबरे यांनी मानले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सौ. स्वाती प्रदीप ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा