किसन रोकडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सेवागौरव




चकलांब्याचा डंका मुंबईत!!
किसन रोकडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सेवागौरव

गेवराई

तालुक्यातील चकलांबा येथील श्री. किसन रोकडे गेल्या 35 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेत दुरुस्ती खाते पर्यवेक्षक म्हणून सेवेत रुजू झाले होते. प्रथम श्रेणी मिस्त्री दुरुस्ती खात्यात त्यांनी अत्यंत उत्तमरीत्या सेवा देतानाच फुले -आंबेडकर चळवळीत ते सक्रिय झाले. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या समवेत आणि मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन केले. मुंबईच्या अनेक वस्त्यांमध्ये जाऊन फुले- आंबेडकर विचार व्याख्यानाच्या माध्यमातून रुजविला.
श्री किसन रोकडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवापुर्ती सोहळा बी वार्डचे सहाय्यक आयुक्त श्री अजित कुमार अंबी यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. जे जे रुग्णालयासमोरील मनपाच्या कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमास किसन रोकडे यांचे शेकडो चाहते उपस्थित होते.उत्तम संघटक, उत्तम कार्यकर्ता, उत्तम वक्ता तसेच मनमिळाऊ आणि कठीण प्रसंगी मदतीला धावून जाणारा सहकारी म्हणून अनेकांनी आपल्या भावना कार्यक्रमात व्यक्त केल्या.विशेषतः कोरोना काळात जीवाची परवा न करता उपेक्षित आणि गरीब लोकां पर्यंत त्यांनी मदत पोहोचविली. चकलांबा ही त्यांची मातृभूमी! येथे देखील त्यांनी दोन टप्प्यांमध्ये 200 किट्स गरजवंतांना कार्यकर्त्यामार्फत वाटप केले. श्री अजित कुमार आंबी यांनी देखील अध्यक्ष भाषणातून किसन रोकडे यांच्या कार्यालयीन आणि सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. धावपळीचे काम करत असताना देखील त्यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊन मुला-मुलींना उच्चशिक्षित केले हे विशेष होय असे नमूद करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास पूर्ण कुटुंबीय तसेच शेकडो सहकारी कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आयु.किसन रोकडे यांनी सत्काराला उत्तर दिले.ते म्हणाले- कार्यालयीन काम करत असताना कुटुंबाचे आणि समाजाचे ऋण फेडता आले याचा आनंद आहेच आणि येथून पुढे देखील सामाजिक कार्यात मी सक्रिय राहील अशी ग्वाही दिली. सहभोजनाने कार्यक्रमाची समाप्ती झाली.
चकलांबा येथील वार्षिक सामाजिक उपक्रमात त्यांचा मोठा सहभाग असतो. कोविड कालावधीत गरीबांच्या मदतीसाठी त्यांनी आर्थिक मदत केली होती. मुंबईत गावाकडील सामान्यांना मदतीसाठी ते कार्यरत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा