उत्तर नाही उत्तरदायित्वाची बीड मध्ये सभा !




उत्तर नाही उत्तरदायित्वाची बीड मध्ये सभा !

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज!

खा.प्रफुल पटेल, खा.सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे, आदीतीताई तटकरे, रुपालीताई चाकणकर, सुरज चव्हाण आदी मान्यवर राहणार उपस्थित

धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली सभेची जय्यत तयारी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत निघणार भव्य रॅली 

वेगवेगळ्या राज्यातील बँड असणार विशेष आकर्षण

बीड (दि. 26) – रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड शहरात होत असलेली सभा ही कोणालाही उत्तर देण्यासाठी नाही तर उत्तरदायित्वाची सभा आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी म्हटले आहे त्यानुसार अजितदादा पवार तसेच पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल भाई पटेल, प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत रविवारी बीड येथे जाहीर सभा संपन्न होणार आहे.

या सभेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार नियोजन करण्यात येत असून अजितदादांसह सर्वच मंत्र्यांच्या व मान्यवरांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज झाली आहे. जागोजागी स्वागतच्या कमानी व फलक उभारण्यात आले असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

*असा आहे सभा मंडप*

परभणी येथील प्रसिद्ध संजेरी मंडप यांच्या माध्यमातून या सभेचे स्टेज व मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. 80 बाय 40 फुटांचे भव्य स्टेज तयार करण्यात आले आहे. बाजूस एक पत्रकार कक्ष तर पावसाचे वातावरण लक्षात घेत भव्य वॉटर प्रूफ मंडप उभारण्यात आला असून, या मंडपाची 50 ते 55 हजार लोक बसण्याची क्षमता आहे, महिलांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सभास्थळी एकूण 1 लाख पेक्षा अधिक लोक जमतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

*भव्य रॅली*

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा.प्रफुल पटेल, खा.सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री कु. आदीतीताई तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांसह जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय व मान्यवर हे एकत्रित दुपारी दीडच्या सुमारास बीड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील, त्यानंतर मुख्य रस्त्यावरील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य रॅलीस सुरुवात होईल. या रॅलीमध्ये स्थानिक वेशभूषा असलेले केरळ येथील खास बँड पथक, पंजाब येथील बँड पथक, जबलपूर (मध्य प्रदेश) येथील बँड पथक, त्रिपुरा येथील बँड पथक, मुंबई येथील पारंपरिक ढोल – ताशा पथक हे विशेष आकर्षण असणार आहे. रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोचून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मान्यवरांचे सभास्थळी आगमन होईल.

*बाहेरून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था*

सबंध बीड जिल्ह्यातून हजारो लोक या कार्यक्रमासाठी येणार असून परळी मतदारसंघातून 150 एसटी बसेस बुक करण्यात आल्या आहेत. या सर्व बसेसची पार्किंग व्यवस्था जिल्हा रुग्णालयाच्या मागील जुन्या एसपी ऑफिसच्या मैदानात करण्यात आलीय. त्याचबरोबर खाजगी वाहनांसाठी बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिरासमोरील नदीपात्र मैदान, आशीर्वाद लॉन्स, ज्ञानेश्वर पब्लिक स्कुलचे मैदान राखीव ठेवले आहे. अहमदनगर रस्त्यावर आष्टी-पाटोदा-शिरूर भागातून येणाऱ्या वाहनांना आयटीआय मैदान व चंपावती शाळेचे मैदान तर बीड तालुक्यातील वाहनांना माने कॉम्प्लेक्स जवळील पारस मैदान राखीव ठेवले आहे. मोंढा रोड वरील फटाका मैदान तसेच जालना रोड वरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागील उत्तम नगर परिसर मैदान पार्किंग साठी राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण यांनी दिली आहे.

*परळी पॅटर्नची जिल्ह्यात चर्चा*

दरम्यान या सभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा पवार व मंत्रिमंडळातील सर्वच सदस्य प्रथमच बीड जिल्ह्यात येत आहेत. यामुळे बीड शहरात उंच कमानी, कट आऊट, यासह स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. बीड शहरात प्रथमच परळी प्रमाणे नियोजन करण्यात येत असून ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरेख नियोजन करण्यात आले असल्याची चर्चा जिल्हा भरात आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा