कोरोना नियंत्रणासाठी सभापती – बळीराम गवते यांचा पुढाकार




 

जिथे गरज तिथे अँटीजन तपासणी कॅम्प”चा उपक्रम, लक्षणे दिसताच तपासणी करण्याचे आवाहन

बीड !जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या आटोक्यात येत नाही. ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या, अंगावर दुखणे काढण्याचे प्रमाण लक्षात घेत बीड पंचायत समितीचे सभापती बळीराम गवते यांनी रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. रुग्णांना बीडमध्ये मदत करतानाच त्यांनी आता ग्रामीण भागातील प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोना तपासणीसाठी जनजागृती करण्याबरोबरच त्यांनी आता जिथे गरज तिथे अँटीजन तपासणी कॅम्प सुरू केला आहे. बेलुरा येथे मंगळवारी (दि.18) रोजी 60 लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी केली.

बीड जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटता तुटत नाही. आरोग्य यंत्रणा, प्रशासन प्रयत्न करत आहेत. अशावेळी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या बीड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी बीड पंचायत समितीचे सभापती बळीराम गवते यांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात रुग्ण संख्या जास्त असून लोकं अंगावर दुखणं काढत आहेत. परंतु परिस्थिती गंभीर झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची परिस्थिती बिकट होत आहे. तेव्हा नागरिकांनी या आजाराला न घाबरता लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करावी यासाठी बळीराम गवते यांच्याकडून जनजागृती केली जात आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, जेवढे लवकर निदान, तेवढे लवकर उपचार अन लवकर आजारातून मुक्ती मिळवण्याचा सल्लाही ते लोकांना देत आहेत. परंतु ग्रामीण भागातील नागरिक कोरोना तपासणीच्या ठिकाणी असलेल्या गर्दीच्या भीतीने अंगावर दुखणं काढत असल्याचे पाहून श्री. गवते यांनी “जिथे गरज तिथे अँटीजन तपासणी” हा उपक्रम सुरू केला आहे. मंगळवारी (दि.18) बेलुरा येथील लक्षणे असलेल्या 60 नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यात आली. डॉ. कासट, डॉ. राऊत यांच्यासह त्यांच्या स्टाफ ने रुग्णाची तपासणी करून उपचार केले.

नागरिकांनी संपर्क साधावा
अनके गावात सर्दी, ताप, खोकला, निमोनिया आदी आजार असलेली व कोरोनाची लक्षणे असलेली रुग्ण आहेत. काही ठिकाणी तर ही संख्या लक्षणीय आहे. तेव्हा आपल्या गावाला कोरोनापासून वाचवण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. जिथे अँटीजन तपासणी शिबीर घ्यायचे असेल तेथील युवकांनी संपर्क साधावा असे आवाहन देखील गवते यांनी केले आहे.

बळीआप्पा गवते यांचे कार्य कौतुकास्पद

आम्हाला एप्रिल- मे महिन्यात कुटुंब सर्वेक्षणात बेलुरा गावात कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची लक्षणीय संख्या जाणवली. मात्र आम्ही सांगूनही लोकं तपासणीसाठी पुढे येत नव्हते. तेव्हा सभापती बळीआप्पा गवते यांनी स्वतः लोकांना चाचणीचे महत्व पटवून दिले. तसेच आज 60 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. आप्पाचे कार्य कोरोनाला आटोक्यात आणण्यात महत्वाची भूमिका निभावेल, तसेच त्यांचा गरज तिथे अँटीजन चाचणी हा उपक्रमही कौतुकास्पद असल्याचे शिक्षक गणेश कदम यांनी म्हटले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा