त्रासाला कंटाळून मुलीने केली वडिलांची लाकडी दांड्याने हत्या




त्रासाला कंटाळून मुलीने केली वडिलांची लाकडी दांड्याने हत्या
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील घटना

Daily Marathwada patra Team

 

नागपूर ! शारीरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या सावत्र वडिलांची लाकडी दांड्याने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरात घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील सावळी बेबी येथील रहिवासी असणाऱ्या मुलीला तिचा सावत्र वडील सातत्याने बळजबरी करत होता. या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने सावत्र वडिलांच्या तोंडावर लाकडी दांड्याने वार करून हत्या केली आहे. याप्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मृताची पत्नी आणि मुलीला ताब्यात घेतलेय.

ज्ञानेश्वर दामाजी गडकर असे हत्या झालेल्या सावत्र वडिलांचे नाव असून ते 60 वर्षांचे होते. पंधरा वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीने सोडून दिल्यानंतर मृत ज्ञानेश्वर याने वंदना नावाच्या एका विवाहित महिलेशी लग्न केले होते. लग्नावेळी वंदनाला पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी होती. लग्न झाल्यानंतर ज्ञानेश्वर सावळी बीबी याठिकाणी वंदनासोबत राहू लागला. काही दिवस एकत्र राहिल्यानंतर ज्ञानेश्वर वर्धा जिल्ह्यातील खापरी येथे राहायला गेला. पण तो अधूनमधून सावळी बीबी येथे वंदनाला भेटायला जात होता.

भेटायला आल्यानंतर तो वंदनाला आणि सावत्र मुलीला नेहमी त्रास द्यायचा. सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मृत सावत्र वडील ज्ञानेश्वर दारू पिऊन आला. त्याने 17 वर्षीय सावत्र मुलीवर बळजबरी करण्यास सुरुवात केली. यावेळी ते पत्नी वंदनाला देखील आवरत नसल्याचे पाहून पीडित मुलीने जवळच पडलेल्या लाकडी दांड्याने ज्ञानेश्वरच्या तोंडावर वार केला. या एका फटक्यात ज्ञानेश्वर बेशुद्ध पडला. यानंतर रक्तप्रवाह जास्त झाल्याने ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा