आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले; हे सरकार पुढील पाच वर्ष टीकेल




मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असे कोणाला पटले नसते असे म्हटले आहे. आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले आहे. हे सरकार पुढील पाच वर्ष टीकेल असा ठाम विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शरद पवार पुढे म्हणाले की, आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिलेले आहे. शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असे कोणला पटले नतसे. पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारलेला आहे. तिन्ही पक्षांनी योग्य पावले टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे, असे कौतुक शरद पवारांनी यावेळी केले आहे. सरकार झाल्यानंतर किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरु होती अशी आठवण करुन देताना हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष टीकेल असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बसले आणि चर्चा केली असे सांगत लगेच वेगवेगळ्या शंका घेण्यात आल्या असे सांगत शरद पवारांनी यावेळी टीकाकारांना उत्तर दिले आहे. शिवसेनेसोबत आपण कधी काम केले नाही. पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचे राज्य आले त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसे होणार नाही,असे शरद पवार म्हणाले आहेत.
हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नाही, असे  शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
देशात अनेकांनी अनेक पक्ष काढले. १९७७ मध्ये जनता पार्टीचा प्रयोग झाला पण दोन वर्षात तो प्रयोग संपला. असे अनेक पक्ष आले.. पण राष्ट्रवादीने २२ वर्ष पूर्ण केली. सहकाऱ्यांच्या कष्टाने, जनतेच्या बांधिलकीमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहेत. जनतेचा विश्वास संपादन करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. कधी आपण सत्तेत होतो तर कधी नव्हतो, पण त्याचा त्याचा फारसा काही परिणाम होत नाही, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा