अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याबद्दल 1 लाख रुपयांचा दंड !




लातूर l कायद्याने झाडे तोडण्यास मनाई असताना परवानगी न घेता अनधिकृतपणे घरातील 2 झाडे तोडल्याबद्दल महानगर पालिकेच्या वतीने संबंधित नागरिकाला 1 लाख रुपयांचा दंड करण्यात आला. क्षेत्रीय कार्यालय क्र. बी मार्फत ही धडक कारवाई केली. झाडे तोडण्यास मदत करणार्‍या पालिकेच्या उद्यान विभागाच्या कंत्राटी कर्मचार्‍यालाही 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
शहरातील शिवाजीनगर भागात मुंदडा स्टील वर्क्सच्या समोर पुष्पा ओमप्रकाश सोमाणी यांचे निवासस्थान आहे.या घरात बदामाची 30 फूट उंचीची व 23 इंच व्यास असणारी 2 झाडे होती. सोमाणी यांनी कसलीही परवानगी न घेता गुरुवारी ही दोन्ही झाडे तोडून टाकली. याची माहिती मिळताच महानगर पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्र. बी ने तेथे धाव घेतली. घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली असता दोन्ही झाडे पुर्णपणे तोडून टाकल्याचे निदर्शनास आले. सोमाणी यांनी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 या कलमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे महानगर पालिकेच्या वतीने प्रति झाड 50 हजार रुपये याप्रमाणे 2 झाडांसाठी सोमाणी यांना 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. संबंधितांकडून रक्कम वसूल करण्यात आली. ही झाडे तोडण्यासाठी मनपाच्या उद्यान विभागातील कंत्राटी कर्मचारी शब्बीर बासू शेख याने सोमाणी यांना मदत केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनाही 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. पालिका आयुक्त अमन मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी यांनी ही कार्यवाही पार पाडली. लातूर शहराला हरित व सुंदर करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. नागरिकांनी स्वतः वृक्षारोपण करून यात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी वृक्षतोड करू नये. अत्यावश्यक परिस्थितीत झाड तोडणे गरजेचे असेल तर त्यासाठी महानगर पालिकेकडून रितसर परवानगी घ्यावी. परवानगी न घेता वृक्षतोड केली तर दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त अमन मित्तल यांनी दिला आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा