वर्षभरापासून पर्यटन व्यवसायिकांच्या गळ्याला बेरोजगारीची फास कायम




फर्दापूर : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे बारा महिन्यांहून अधिक काळ जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची कवाडे बंद असल्याने पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या फर्दापूर (ता.सोयगाव) येथील जवळपास 350 हून अधिक छोट्या-मोठ्या पर्यटन व्यवसायिक व कामगारांची प्रचंड आर्थिक कुचंबणा झाली असून लॉकडाऊनमुळे वर्षभरापासून पर्यटन व्यवसायिकांच्या गळ्याला लागलेला बेरोजगारीचा फास कायम असल्याने व बेरोजगार झालेल्या पर्यटन व्यवसायिक व कामगारांना इतरत्र ही काम मिळत नसल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येवून ठेपल्याचे दिसून येत आहे.

सन 2020 मध्ये कोरोना संसर्गाच्या प्रसाराने जगात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यावेळी 17 मार्च ते 10 डिसेंबर अशी तब्बल नऊ महिने अजिंठा लेणीची कवाडे पर्यटकांना बंद करण्यात आली होती. त्यानंतर सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असतानाच नविन वर्षाच्या प्रारंभीच नव्या स्ट्रेनसह आलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा प्रसार राज्यात वेगाने होतांना दिसून आल्याने 12 मार्च 2021 रोजी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची कवाडे पून्हा पर्यटकांनसाठी बंद करण्यात आली आहे. यामुळे कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत सलग नऊ महिने व दुसर्‍या लाटेत सलग तीन महिने अशी तब्बल बारा महिने अजिंठा लेणीची कवाडे पर्यटकांसाठी बंद असल्याने येथील पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यापारी, हॉटेल-लॉज टॅक्सी, रिक्षा चालक, फेरीवाले, डोलीवाले, हॉटेल मधील कामगार अशा जवळपास 350 हून अधिक पर्यटन व्यावसायिक व कामगार कुटुंबांची प्रचंड आर्थिक कुचंबणा झाल्याचे दिसत आहे.

अनेक गरीब कुटुंबांना एकवेळ जेवणाची भ्रांत पडून उपासमारीची वेळ येवून ठेपल्याचे दिसून येत आहे. अजिंठा लेणीची कवाडे बंद झाल्यानंतर येथील अनेक कामगार व छोट्या व्यवसायिकांनी परिसरात इतरत्र मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याचा प्रयत्न केला. परंतु लॉकडाऊनमुळे अजिंठा लेणी व फर्दापूर परिसरातील जवळपास सर्वच व्यवसाय डबघाईला गेल्यामुळे बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळलेल्या छोट्या पर्यटन व्यावसायिक व कामगारांना इतरत्रही रोजगार मिळेनासा झाला आहे. परिणामी अजिंठा लेणीतील पर्यटन व्यवसायावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या जवळपास 350 हून अधिक गरीब पर्यटन व्यावसायिक व कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येवून ठेपल्याचे दिसत आहे. येथील गरीब पर्यटन व्यावसायिक कुटुंबांना शासनाने मदतीचा हात देवून कोरोना संकटाच्या या भयावह काळात दिलासा द्यावा. अशी मागणी पर्यटन व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा